Site icon

सन ऑफ सरदार’ फेम अभिनेता मुकुल देव यांचे निधन; वयाच्या ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेता मुकुल देव

Actor Mukul Dev

Siddhi News मुंबई :हिंदी सिनेसृष्टीतील ओळखीचे नाव असलेले आणि ‘सन ऑफ सरदार’, ‘यमला पगला दीवाना’, ‘आर… राजकुमार’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेता मुकुल देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी, त्यांनी २४ मे रोजी आपला शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत असून अनेक सहकलाकार, चाहते सोशल मीडियावरून शोकभावना व्यक्त करत आहेत.

मुकुल देव हे प्रसिद्ध अभिनेता राहुल देव यांचे थोरले बंधू होते. दिल्लीत १७ सप्टेंबर १९७० रोजी एका पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरी देव, जे दिल्लीत पोलीस आयुक्त होते. हरी देव यांचे २०१९ मध्ये वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले होते.
मुकुलने शिक्षण दिल्लीतील सेंट कोलंबस स्कूलमधून पूर्ण केलं होतं. यानंतर त्यांनी इंदिरा गांधी नॅशनल फ्लाइंग अकॅडमीत प्रशिक्षण घेऊन पायलट म्हणूनही शिक्षण घेतलं होतं — ही बाब फारच कमी लोकांना माहिती आहे!

अभिनेता मुकुल देव यांचा  सिने प्रवासाचा थोडक्यात आढावा…

मुकुल देव यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं ते १९९६ साली ‘मुमकिन’ या दूरदर्शनवरील मालिकेतून. त्याच वर्षी त्यांनी ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, ज्यात मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन देखील प्रमुख भूमिकेत होती.
पुढे त्यांनी ‘वजूद’, ‘कोहराम’, ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’, ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांत खलनायक आणि सहाय्यक भूमिकांमधून छाप पाडली. हिंदीसोबतच त्यांनी पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्येही काम केलं होतं.

छोट्या पडद्यावरही अभिनेता मुकुल देव यांचा ठसा…

फक्त मोठ्या पडद्यापुरताच मर्यादित न राहता, मुकुल देव यांनी छोट्या पडद्यावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘कहीं दिया जले कहीं जिया’, ‘कहानी घर घर की’, ‘प्यार जिंदगी है’ या मालिकांमधूनही त्यांनी अभिनय केला.
याशिवाय, ‘फिअर फॅक्टर इंडिया’ च्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालनही त्यांनी केलं होतं. ‘कभी कभी प्यार कभी कभी यार’ या डान्स रिअॅलिटी शोमधूनही प्रेक्षकांपुढे आले होते.

लेखकाचंही वावडं नव्हतं…

२०१८ मध्ये आलेल्या हंसल मेहता दिग्दर्शित ‘ओमेर्ता’ या चित्रपटासाठी मुकुल यांनी लेखक म्हणून काम केलं होतं. अभिनयाबरोबरच त्यांच्या लेखनकौशल्यालाही दाद मिळाली होती.
त्यांच्या ‘यमला पगला दीवाना’मधील भूमिकेसाठी त्यांना सातवा अमरीश पुरी पुरस्कारही देण्यात आला होता.

अभिनेता मुकुल देव यांच्या मृत्यूचं नेमकं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. पण एका उत्तम अभिनेत्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात भाऊ राहुल देव आणि कुटुंबीय आहेत.

आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!


WhatsApp ग्रुप Join करा

Exit mobile version