Siddhi News कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरात आंदोलन पेटलं, सरकारला जबरदस्त इशारा.
शेतकऱ्यांचा एल्गार: शक्तीपीठ महामार्ग नकोच !
शेती हिरावून घ्यायची? तर रस्त्यावर रण माजवू ! – हेच बाणेदार शब्द होते कोल्हापुरात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांचे. नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातील 12 जिल्ह्यांमधील शेतकरी एकत्र आले आहेत आणि या प्रकल्पाच्या विरोधात आज आंदोलनाचा जोर जबरदस्त वाढलेला पाहायला मिळतो आहे.
प्रस्तावित ‘शक्तीपीठ एक्स्प्रेसवे’ म्हणजे काय?
शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा प्रस्तावित द्रुतगती मार्ग असून, त्याची अंदाजित किंमत ₹86,000 कोटी रुपये आहे. हा महामार्ग राज्यातील सुपीक शेतीचे हजारो हेक्टर क्षेत्र गिळंकृत करणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
शेतकऱ्यांचा ठाम विरोध : जमीन नाही देणार!
बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एकमुखी भूमिका घेतली आहे की,
कोणत्याही परिस्थितीत सुपीक जमीन या महामार्गासाठी देणार नाही.
शेतकरी संघटनांनी कृती समित्यांच्या माध्यमातून या विरोधाला एक रचनात्मक आणि एकसंध रूप दिलं आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आघाडीवर आहेत.
कोल्हापुरात महामार्ग रोको, सरकारला इशारा
कोल्हापूर येथे मंगळवारी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीजवळ शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. तब्बल दीड तास महामार्ग बंद ठेवत घोषणाबाजी करण्यात आली –
“शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे!”
राजू शेट्टींनी सरकारला थेट इशारा दिला –
“ड्रोनने मोजणी करायला आले, तर ड्रोनही फोडू!”
विठ्ठलाची पूजा की साकडे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकादशीसाठी पंढरपूरला जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी सणसणीत विधान केलं –
विठ्ठलाने मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा!
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त
कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमध्येही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नदीत उड्या मारण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना रोखलं.
विधानसभेतही उठलं आंदोलनाचं वादळ
या विरोधाचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत. काही आमदारांनी ठाम भूमिका घेत ही योजना थांबवण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची तयारी दर्शवली आहे.
विकास हवा, पण शेती उद्ध्वस्त करून नाही !
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात उभा ठाकलेला शेतकरी वर्ग विकासाला विरोध करत नाही –
तो विरोध करतो त्याच्या जमिनीच्या अन्यायकारक हिसकावणीला.
राज्य सरकारने हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या भावना आणि भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे.
हे हि वाचा- शक्तीपीठ महामार्गावर राजू शेट्टींचा ५० हजार कोटी भ्रष्टाचाराचा आरोप
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!