आंध्र प्रदेशच्या तेनाली शहरात, सांगलीच्या सिद्धेश घोरपडे या तरुणावर चोरीच्या सोन्याच्या संशयातून पोलिसांकडून अन्यायकारक पद्धतीने गलाई बांधवाचा छळ करण्यात आला. या छळामुळे मानसिक तणावात गेलेल्या घोरपडे यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
आंध्र प्रदेशात गलाई बांधवाचा छळ: तेनालीत घडलेली धक्कादायक घटना
सांगली जिल्ह्यातील रेणावी गावचा रहिवासी सिद्धेश शिवाजीराव घोरपडे (वय ३५) यांनी आंध्र प्रदेशातील तेनाली (विजयवाडा जवळ) येथे आत्महत्या केली. पोलिसांकडून चोरीच्या सोन्याच्या संशयातून झालेला मानसिक आणि शारीरिक छळ हे या आत्महत्येमागचं मुख्य कारण असल्याचं समोर आलं आहे.
चोरीचे सोने घेतल्याचा संशय, थेट पोलिस ठाण्यात
२९ मे रोजी आंध्र प्रदेश पोलिसांनी सिद्धेश यांच्या गलाई दुकानात अचानक छापा टाकला. विजयवाडा शहरात काही दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्याच्या तपासात पोलिसांनी त्यांच्यावर संशय घेतला की, चोरीचं सोने त्यांच्या दुकानात गाळायला आणलं गेलं.गलाई व्यावसायिकाला दागिन्याचं मूळ माहीत नसतं, हे माहित असूनही पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेऊन मारहाण केली, छळ केला.
“माझा छळ सुरू आहे” – शेवटचा WhatsApp स्टेटस
रात्री १२ वाजता सिद्धेश यांनी WhatsApp वर “माझा छळ सुरू आहे, पोलिसांनी मला भर बाजारात फिरवत मारहाण केली” असा स्टेटस ठेवला. त्यानंतर काही तासांतच, रात्री २ वाजता त्यांनी आत्महत्या केली.
हा प्रकार अधिक भावनिक ठरला कारण दुसऱ्याच दिवशी त्यांची लहान मुलगीचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने ते गावी परत येणार होते. मात्र आत्मसन्मानाला झालेली ठेच आणि पोलिसी छळ न सहन झाल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.
गलाई व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
एकीकडे ‘लघुउद्योगाचा दर्जा’, दुसरीकडे पोलिसांचा छळ
महाराष्ट्र सरकार गलाई व्यवसायाला लघुउद्योगाचा दर्जा देण्याच्या घोषणा करते, पण दुसरीकडे दुसऱ्या राज्यात गलाई व्यावसायिकांवर अन्याय सुरूच आहे. ही दुर्दैवी विसंगती समाजमाध्यमांवरही चर्चेचा विषय ठरली आहे.
वायएसआर काँग्रेसकडून निषेध
जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपी पक्षाने या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रीय माध्यमांनाही टॅग करत निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांनी छळ केला, मृतदेह तातडीने महाराष्ट्रात हलवण्यात आला – असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
गलाई बांधवाचा छळ थांबणार कधी?
हि घटना केवळ सिद्धेश घोरपडे यांची वैयक्तिक शोकांतिका नाही, तर देशभर विखुरलेल्या महाराष्ट्रातील गलाई बांधवाचा छळ हि मोठी समस्या आहे.
राज्यसरकार आणि पोलिस प्रशासनाने एकत्र येऊन गलाई उद्योग क्षेत्रासाठी स्पष्ट नियमावली आणि संरक्षण देणं ही काळाची गरज बनली आहे.
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!