चार कडवट नक्सलवाद्यांचा खात्मा; गडचिरोली पोलिसांचे मोठे यश, छत्तीसगड सीमेवर जबरदस्त चकमक

Siddhi News: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांनी जबरदस्त कारवाई केली आहे. कवंडे भागात माओवाद्यांच्या अस्तित्वाची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी शोध मोहीम राबवली. या दरम्यान माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला, पण पोलिसांनी जलद प्रत्युत्तर देऊन चार माओवाद्यांना ठार केले.

गडचिरोली: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नुकतीच उभी केलेली पोस्ट, कवंडे हद्दीत काही माओवादी दबा बसवून आहेत, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. अति.पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली १२ सी ६० पथके, म्हणजे सुमारे ३०० कमांडो आणि सीआरपीएफची एक तुकडी काल दुपारी कवंडे व नेलगुंडा भागातून इंद्रावती नदीकाठच्या परिसरात मुसळधार पावसात रवाना करण्यात आली.

आज सकाळी पोलीसांनी त्या परिसरात घेराबंदी करून शोध मोहीम सुरू केली असता, माओवाद्यांनी अचानक १२ सी ६० जवानांवर जोरदार गोळीबार सुरु केला. पोलिसांनी त्वरित प्रत्युत्तर दिलं आणि जवळपास दोन तासापर्यंत गोळीबार सुरूच राहिला. अखेर पोलीसांनी संपूर्ण परिसर शोधून चार जहाल माओवाद्यांचे मृतदेह सापडले.

गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगडच्या सीमेला पूर्णपणे सील केले

विशेष म्हणजे, छत्तीसगडमध्ये सध्या पोलिसांच्या मोठ्या कारवाया सुरू आहेत. नुकतंच नक्षल्यांचा नेता बसवा राजू आणि तब्बल २७ माओवाद्यांना छत्तीसगड पोलिसांनी कंठस्नान घातलं आहे, ज्यामुळे त्यांना मोठं यश मिळालं आहे. या कारवायांमुळे माओवाद्यांनी महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात शिरकाव करण्याचा विचार केल्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगडच्या सीमेला पूर्णपणे सील करून ठोक शोध मोहीम राबवली. मोठ्या प्रमाणात नक्षल शोधण्यासाठी सी ६० पथकं तैनात करण्यात आली होती. आज सकाळी गडचिरोली पोलिसांनाही मोठं यश मिळालं आहे.

पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी परिसराला कडक घेराबंदी केली आणि शोधमोहीम राबवली. यावेळी माओवाद्यांचे चार मृतदेह सापडलेत, तसेच एक स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल (SLR), दोन ३०३ रायफल आणि एक भरमार हत्यार पोलिसांच्या ताब्यात आले. घटनास्थळावरून वॉकी-टॉकी, छावणी साहित्य आणि नक्षलवादी साहित्यही जप्त करण्यात आले आहे. सध्या त्या परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, सविस्तर माहिती आज सायंकाळी ५:३० वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे समजते आहे.

Photo Credit: ANI

 

Leave a Comment