पाटणा: बिहार विधानसभा निवडणुका 2025 चं वातावरण तापू लागलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या निवडणुका दोन ते तीन टप्प्यांमध्ये पार पडू शकतात. महत्त्वाचं म्हणजे, दिवाळी आणि छठपर्व लक्षात घेऊनच मतदानाच्या तारखा ठरवण्यात येणार आहेत.
बिहार विधानसभा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपत आहे, त्यामुळे त्याआधीच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून जोमात तयारी सुरू आहे. खुद्द मुख्य निवडणूक आयुक्त यंदा जून महिन्यात बिहार दौर्यावर येणार असल्याची माहिती आहे.
बिहार विधानसभा निवडणुका 2025: प्रशिक्षणावर भर, मतदार यादीत बदलाची मोहीम
निवडणुकीपूर्वी आयोगाने आपले कर्मचारी प्रशिक्षणाच्या प्रक्रियेत गुंतवले आहेत. महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीतील मतदार यादीबाबतच्या वादांपासून धडा घेऊन, आयोग या वेळेस अधिक काटेकोर तयारी करत आहे. बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांना ओळखपत्र देण्यात येणार असून, ते घरोघरी जाऊन मतदार तपासणी करतील.
या पार्श्वभूमीवर, बिहारमध्ये मतदार यादी अद्ययावत करण्याची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे, जेणेकरून १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची नावे यादीत समाविष्ट करता येतील.
बिहार विधानसभा निवडणुका 2025: डुप्लिकेट ओळखपत्रांना रामराम, एआयवर नजर
आता डुप्लिकेट ईपीआयसी नंबर (मतदार ओळखपत्र) रद्द करण्यात आले आहेत. तसेच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या माध्यमातून उद्भवणाऱ्या आव्हानांवर देखील आयोग सज्ज आहे. लवकरच आयोगात एआयसंबंधी स्वतंत्र देखरेख यंत्रणा तयार केली जाणार आहे.
मागील निवडणुकांची झलक
स्मरणात ठेवावं, की २०२० साली बिहार विधानसभा निवडणुका २८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं. निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता.
सणासुदीचा हंगाम आणि निवडणुका
यंदा दिवाळी आणि छठ हे दोन्ही सण ऑक्टोबर महिन्यातच येत आहेत, त्यामुळे आयोग मतदानाच्या तारखा ठरवताना याचा विशेष विचार करणार आहे. सणांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी घेत निवडणूक कार्यक्रम आखला जाणार आहे. तारखांचा अधिकृत घोषणापूर्वी सर्व प्रमुख राजकीय पक्षांशी सल्लामसलत केली जाणार आहे.
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!