Siddhi News दिल्ली :पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं देशभरात नागरी संरक्षण सराव राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमध्ये मॉक ड्रिल गुरुवारपासून मोठ्या प्रमाणात होणार आहेत.
दरम्यान, हरियाणा सरकार २९ मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून ‘ऑपरेशन शील्ड’ नावाची राज्यव्यापी मॉक ड्रिल सुरू करणार असून, यामध्ये राज्यातील सर्व २२ जिल्ह्यांचा समावेश असेल. या सरावामुळे आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रशासनाची सज्जता आणि प्रतिक्रिया क्षमता तपासली जाणार आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतरची सज्जता! चार राज्यांमध्ये मॉक ड्रिल
ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान गोळीबार आणि लष्करी कारवायांबाबत शांततेचं सामंजस्य झालं. त्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत नागरी संरक्षण मोहिमा पुन्हा सुरू होणं, ही केंद्र सरकारच्या धोरणात्मक विचारांचीच पावती आहे.
गृह मंत्रालयानं देशातील चार राज्यांमध्ये मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहेत.त्यात २४४ जिल्ह्यांचा समावेश आहे. या सरावांत ब्लॅकआउट, हवाई हल्ल्याचे सायरन, आपत्कालीन स्थलांतर, युद्धसदृश स्थितींसाठी जनजागृती सत्रं घेण्यात येणार आहेत.
मोदींचा थेट इशारा : हे आता प्रॉक्सी वॉर नाही!
२७ मे रोजी गुजरातमधील गांधीनगर इथं झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. “६ मे रोजी भारतानं ऑपरेशन सिंदूर दरम्यान २२ मिनिटांत ९ दहशतवादी अड्ड्यांचा नायनाट केला. ही कारवाई पूर्णतः कॅमेऱ्यांसमोर पार पडली, जेणेकरून कोणीही पुरावे मागू शकणार नाही,” असं मोदी म्हणाले.
त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “दहशतवाद्यांना शासकीय अंत्यसंस्कार देणं, यावरून हे केवळ दहशतवादी नव्हते, तर पाकिस्तानच्या लष्करी धोरणाचाच भाग होते, हे स्पष्ट होतं.”
शांततेचा पाठपुरावा करतो, पण उत्तर द्यायलाही तयार!
मोदी पुढं म्हणाले, “आज जिथं भारत उभा आहे, तिथं युद्ध लादलं तर उत्तर मिळणारच. आपल्याला कोणताही संघर्ष नको, पण जर कोणी शांतता बिघडवली, तर आपला प्रतिसाद ठाम असेल.”
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!