Siddhi News सांगली : राज्यात पुन्हा एकदा ठिकाणांची नावे बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सांगली जिल्ह्यातील गावांची नावे बदलण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुढे रेटली असून, काही गावांची ऐतिहासिक नावे बदलून त्यांना नव्याने सांस्कृतिक ओळख मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
खानापूरचं नाव भवानीपूर करावं – मुख्यमंत्री फडणवीस यांना पडळकरांचा प्रस्ताव
पडळकर म्हणाले, “मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार असून, त्यात खानापूर शहराचं नाव ‘भवानीपूर’ करण्याची शिफारस करणार आहे. याशिवाय खानापूच्या जवळच असणारे सुलतानगादे आणि जत तालुक्यातील उमदी या गावांची नावे बदलण्याची गरज आहे. ही गावं इतिहासाच्या नोंदींमध्ये आपली मूळ ओळख गमावून बसली आहेत.”
मुघल प्रभाव हटवण्यासाठी गावांची नावे बदलण्याची मागणी – पडळकर यांची भूमिका
सांगली जिल्ह्यातील गावांची नावे बदलण्याची मागणी करताना पडळकर यांनी स्पष्ट केले की, “मुघल कालीन प्रभाव आजही काही गावांच्या नावांमध्ये दिसतो. ही नावे बदलून त्यांना आपली पारंपरिक ओळख परत मिळवून देणं आवश्यक आहे. ही केवळ नामांतराची नव्हे, तर संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची चळवळ आहे.”
‘सर्व धर्म समभाव’ ही संकल्पना एकतर्फी?
पडळकरांनी ‘सर्व धर्म समभाव’ या संकल्पनेवर देखील टीका केली. ते म्हणाले, “ही संकल्पना फक्त हिंदूंवर लादली गेली आहे. इतर समुदायांकडून त्याचे पालन फारसं होताना दिसत नाही. ही मानसिकता बदलायला हवी.”
पहलगाम हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया
पहलगाम येथे घडलेल्या अतिरेकी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना पडळकर म्हणाले, “जर खरोखरच सर्व धर्म बंधुभाव असेल, तर केवळ धर्म विचारून निरपराध हिंदूंवर हल्ले का होतात? कपडे उतरवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. यावर मौन राखणं चुकीचं आहे.”
हे हि वाचा :आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची संधी – 14 जून ही शेवटची तारीख!
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
1 thought on “सांगली जिल्ह्यातील गावांची नावे बदलण्याची मागणी; आमदार गोपीचंद पडळकरांचा ठाम आग्रह”